ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा
काय भुललासी वरलिया रंगा
अगदी असेच आहे आजकाल समाजात. बाह्य सौंदर्यावर भाळून मुले मुली प्रेमाचा खेळ खेळतात. वास्तवाची जाणीव झाली की खेळ मोडून टाकतात. आयुष्य म्हणजे अक्षरशः खेळखंडोबा वाटतो. सारासार विचार करून अंतर्गत सौंदर्याकडे, गुणांकडे कोणी पहातच नाही म्हणण्यापेक्षा त्याची कुणाला गरजच भासत नाही. म्हणून संसार लगेच मोडल्या जातो. घटस्फोटाचे प्रमाण वाढले आहे म्हणजे काय तर संसार म्हणजे काय? लग्न म्हणजे काय या संस्कृती मूल्यांना पायदळी तुडविले जाते आहे. या संस्कृती मूल्यांचे अवमूल्यन होते आहे.
अरे संसार संसार, जसा तवा चुल्ह्यावर
आधी हाताला चटके, तेव्हा मिळते भाकर
संसाराचे अवघे सार बहिणाबाईंनी या दोन ओळीत मांडले आहे. संसार म्हणजे काय? चूल मांडून दोन वेळेचे खाणे, मुलांना जन्म देणे आणि वाढविणे एवढाच संकुचित अर्थ नाही संसाराचा. पूर्ण समर्पण असल्याशिवाय संसार कसा बरे होईल! संसार किंवा प्रपंच म्हणजे विवाहा सारख्या उच्चतम संस्कारावर उभी असलेली इमारत. दोन मनांचे, घराण्यांचे मिलन म्हणजे संसार. एकमेकांस समजून घेऊन आयुष्याची वाटचाल सोबत करण्याचे दिलेले वचन म्हणजे संसार. आपल्या घराण्याच्या परंपरा, वारसा एका पिढीकडून पुढच्या पिढीला हस्तांतरीत करणे म्हणजे संसार. या शिवाय पूर्व संचितानुसार वाट्याला आलेले कर्म आणि कर्तव्ये पार पाडणे म्हणजे संसार. याला आपण स्वतः चा संसार म्हणू शकतो. जो व्यक्तिगत पातळीवर आपल्या जोडीदाराच्या सोबत, आपले सगे सोयरे यांचे भान ठेवत केलेला प्रपंच किंवा संसार.
संसार म्हटला की भांड्याला भांड लागणारच. पण त्याचा आवाज बैठकीत यायला नको. असे माझी आई नेहमी मला सांगायची. तात्पर्य एकच की समजून उमजून एकमेकांचा आदर करत संसार केला तर तो सुखाचा होईल. वास्तविक पाहता संसार फक्त दोघांचाच असतो असे नाही तर या दोघांच्या अनुषंगाने बांधल्या गेलेल्या नात्यांचा एकत्रित असतो. स्वीकार केला म्हणजे तो गुणदोषांसह केलेला आहे हे सूत्र लक्षात ठेवले की संसार सुखाचा होतो.
दुसरा आहे तो विश्व संसार. समाजात राहतो तर समाजाचे पण आपण देणे लागतो. हे विश्वची माझे घर असे म्हणता यायला हवे इतकी प्रगल्भता विचारांची असावी लागेल. हे तेव्हाच शक्य होईल, जेव्हा व्यक्तिगत पातळीवरचा संसार आणि त्याचा अर्थ कळेल, समाजात राहून समाजाची बांधिलकी जपली जाईल, देशाप्रती आदर वाटत असेल तरच विश्व या संकल्पनेला न्याय देता येईल. "मुला-मुलींची वीण वाढवणं आणि चार काटक्या एकत्र करून घरटी बांधणे यालाच संसार म्हणायचे असेल तर, असले संसार कावळे-चिमण्याही करीतच आहेत. पण संसाराचा याहून भव्यतर अर्थ घेणे असेल तर मनुष्यासारखा संसार थाटण्यात आपणही कृत्यकार्य झालो आहोत." सावरकरांचे संसारा विषयी विचार ऐकले, वाचले की हे वाटतं यांनी केला विश्वाचा संसार. यांनाच कळला होता का संसाराचा अर्थ.
संसार किंवा प्रपंच हा मानवी आयुष्यात आहेच. नरदेह प्राप्त झाला आहे म्हणजे संसार हा आहेच. संसार म्हणजे जन्म मृत्यूचे चक्र. यातून सुटका हवी असेल तर संसारात राहून परमार्थ साधा असे रामदास स्वामी म्हणतात. "आधी प्रपंच करावा नेटका l मग घ्यावे परमार्थ विवेका l" त्यांनी स्वतः प्रपंच केला नाही पण प्रपंचात म्हणजेच संसारात राहून परमार्थ कसा साधता येईल हे सांगितले आहे. तुकाराम महाराज हेच सांगतात, "प्रपंच करावा नेटका, कुठे नसावा फाटका" म्हणजे आधी संसार नीट करायचा आहेच. पण त्यासोबतच परमार्थ पण करायचा आहे. प्रगल्भ विचारांच्या माध्यमातून प्रपंच केला तर परमार्थ साधता येतो. गृहस्थाश्रम स्वीकारून आपल्या बऱ्याच संतांनी परमार्थाची कास धरून आत्मज्ञान प्राप्त केले आहे. संसार टाकून परमार्थ करणे आणि परमार्थ टाकून संसार करणे दोन्ही दोषयुक्त. म्हणून दोन्ही सोबतच करायचे. आधी याचा अर्थ इथे वयाचा दाखला नाही तर संसारात राहून परमार्थ करण्याचा मार्ग समर्थांनी आपल्याला सांगितला आहे. दोन्ही बरोबरच करायचे. प्रपंचात राहून परमार्थ करायचा पण प्रपंचात पडायचे नाही.
संसारात राहूनच सगुणाचा ध्यास घेऊन निर्गुण निराकार परमात्म्याचे स्वरूप ओळखण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच आत्मज्ञान होऊन नरदेहाचे सार्थक होईल यात तिळमात्र शंका नाही..
रसिका राजीव हिंगे
No comments:
Post a Comment